राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता १० वी च्या परीक्षा दरवर्षी मार्च महिन्यामध्ये घेण्यात येतात. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक सुंदर वळण असते. या वळणावरून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा सुस्पष्ट व्हायला लागतात. बालपण आणि सळसळते तारुण्य यामधला अतिशय स्वप्नाळू असा हा काळ असतो. जगातील कोणतीही गोष्ट करून दाखवण्याची ऊर्मी मुलांमध्ये निर्माण झालेली असते. या ऊर्मीला सकारात्मक व सर्जनशील मार्ग उपलब्ध करून देणे ही सरकार, समाज, शिक्षक व पालक यांची जबाबदारी असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे. आज भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हुशारीने जगभर सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा तणाव न घेता आनंदाने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, या शब्दात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
शालान्त परीक्षा महत्त्वाची असली तरी ते सर्वस्व नाही, ही गोष्टही लक्षात घ्या. आमच्यासाठी तुम्ही सर्वांत महत्त्वाचे आहात. परीक्षेतील यश-अपयश या फारच दुय्यम गोष्टी आहेत, अपयशामुळे सर्व काही संपत नाही. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.
मंडळाने यापूर्वीच जाहीर केल्यानुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहोचा. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जाण्यासाठी राज्य मंडळ; तसेच विभागीय मंडळ स्तरावर आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. परीक्षेच्या काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
सोशल मीडियावर पेपर फुटला किंवा पेपर पाहिजे असे संदेश फिरत असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
या प्रकारच्या बातम्या जाणून बुजून पेरल्या जातात. अशा बेजबाबदार कृत्यांमुळे तुमच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो.
परीक्षा काळात फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. येणारा काळ तुमचाच आहे, याची मला खात्री आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भविष्य आहात, त्याचबरोबर देशाचे व जगाचे नेतृत्व करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.