राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ही तीव्रता अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावधगिरीने पावले टाकत आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना ही परिस्थिती लक्षात घेऊन २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर काही खासगी शाळांनी ऑनलाइनचा पर्याय निवडत तशी यंत्रणाही सज्ज केली आहे, मात्र काही खासगी शाळा सुरू असल्याने सीबीएसई, आयसीएसई शाळांचे वेळापत्रक राज्य शासनाच्या शाळांच्या वेळाप़त्रकाप्रमाणे करण्याची मागणी पालक करत आहेत.
राज्य सरकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा परीक्षा संपल्यानंतर एप्रिल, मे महिन्यात सुट्टीसाठी बंद असतात. गेल्या काही वर्षांपासून मार्च, एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. बहुतांश शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान आहे. ठाण्यात एप्रिल महिन्यात ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा एप्रिल महिना संपेपर्यंत चालू असतात. काही शाळांमध्ये पंखेदेखील नादुरुस्त असतात.
लहान मुले पाणी पिण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गत वर्षाच्या तापमानाचा अंदाज घेऊन शाळांचे वेळापत्रक बनविण्याचे आदेश द्यावेत. तसेच फी केंद्रस्थानी न ठेवता विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन सीबीएसई, आयसीएसई शाळाचे वेळापत्रक राज्य शासनाच्या शाळांच्या वेळापत्रप्रमाणे करण्याची मागणी मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.