Narasimha Jayanti 2023: एका क्रूर दैत्याचा अंत, नृसिंह अवताराची कथा जाणून घेऊया

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूचा नृसिंह अवतार प्रकट झाला, म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते. भक्त प्रल्हादाची निस्सीम विष्णू भक्ती आणि हिरण्यकश्यपूचा वध याची कथा सर्वश्रुतच आहे.हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागतांना म्हटले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.”

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.

कितीही मोठा वर मागितला असला, तरी अहंकार, मद आणि अनन्वित अत्याचार यांमुळे मृत्यू निश्चित होतो, हे या कथेवरून आपल्याला समजते. प्रामाणिकपणा, सच्चेपणा, निस्सीम भक्ती, उपासना याचे महत्त्वही या कथेवरून आपणास मिळते. ब्रह्मदेवांनी दिलेला वर हा अमरत्वाच्या जवळ जाणारा होता. मात्र, हिरण्यकश्यपूने आपल्या वर्तनातून मृत्यूचे सत्य स्वीकारले नाही. माणसाने जन्म घेतला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ असतोच.

Source link

Hiranyakashipuknow about significance in marathiNarasimha AvatarNarasimha JayantiNarasimha Jayanti 2023दशावतारमृत्यूवैशाख शुद्ध चतुर्दशीश्रीनृसिंह जयंती २०२३हिरण्यकश्यपू
Comments (0)
Add Comment