सत्तर हजार शिक्षक ठरतील अतिरिक्त

परभणी : राज्यातील शाळांमधून आधार अवैध व आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २४,६०,४१३ असून, हे विद्यार्थी १५ मेपर्यंत वैध झाले नाहीत, तर ही पटसंख्या वगळून संचमान्यता आधार संलग्नीत विद्यार्थी संख्येवर करण्यासंदर्भात ठरलेले आहे. हा निर्णय झाला, तर एकूण २४ लाख ६० हजार ४१३ विद्यार्थी शाळाबाह्य होतील आणि साधारणतः ६० ते ७० हजार शिक्षक अतिरिक्त होतील. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह माजी आमदार अ‍ॅड. विजयराव गव्हाणे (परभणी) यांनी निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केले आहे की, संचालकांनी (प्राथमिक) १५ मे २०२३ च्या आधार संलग्नीत विद्यार्थी संख्येवर शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या आदेशानुसार आपले लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी हे पत्र देत आहोत. युडाइजच्या रेकॉर्डनुसार राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या २ कोटी १३ लाख ९६ हजार ९६१ इतकी असून आधार उपलब्ध नसलेले विद्यार्थी ४ लाख ३४०, तर आधार उपलब्ध असलेले विद्यार्थी २ कोटी ९ लाख ९६ हजार, ६२१ एवढे आहेत. यूडाईजने आधार पडताळणी केलेले विद्यार्थी १ कोटी ९१ लाख ४६ हजार १५९ असून यातील आधार वैध असलेले विद्यार्थी १ कोटी ६९ लाख ५५ हजार ६८६, तर आधार अवैध असलेले विद्यार्थी २४ लाख ६० हजार ४१३ इतके आहेत.

शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे त्यांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकणार नाही. या बाबी उच्च न्यायालयाच्या सुमोटो याचिका ०२/२०२२ मध्ये न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहात का ? या आधीही शालेय हक्क कायद्याच्या पीटीआरचा चुकीचा संदर्भ घेऊन संचमान्यता केलेल्या होत्या. त्यामुळे साधारणतः १७ हजार शिक्षक अतिरिक्त झालेले होते. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामधे दिवाणी याचिका प्रलंबित आहेत. संच मान्यता २०१३-१४ ला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेचा निर्णय लागेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश झाले आहेत. विद्यार्थी प्रवेशास आधार अनिवार्य करणे किंवा आधार उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही, या प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पूर्ण खंडपीठाचा निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी जर आधार संलग्नीत विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन संच मान्यता केल्यास साधारणतः २५ लाख विद्यार्थी शाळाबाह्य होऊन शालेय सुविधापासून दूर होतील व आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesSchool teachersTeacher additionalशिक्षक अतिरिक्त
Comments (0)
Add Comment