बारावीचा मार्च – एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला होता तर यंदाचा निकाल हा ९१.२५ टक्के इतका लागला आहे. या वर्षी निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. मात्र, शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.
निकाल का घटला? बोर्डानं कारण सांगितलं
बारावीचा यंदाचा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली. निकाल का घटला हे सांगताना शरद गोसावी यांनी २०२१-२२ ची बारावीची परीक्षा आणि २०२२-२३ ची परीक्षा यातील फरक सांगितला. ते म्हणाले की मागील परीक्षा ही वेगळ्या वातावरणात पार पडली होती. विद्यार्थ्यांना ७०, ८०, किंवा १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास वाढीव दिला गेला होता. ती परीक्षा पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात आली होती. यावर्षी शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यावेळी कोणताही वाढीव वेळ दिला नव्हता. हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
आपण नियमित परीक्षा म्हणतो म्हणजे जशी परीक्षा २०२० मध्ये पार पडली होती तशी परीक्षा यंदा पार पडली. २०२० चा निकाल ९०.६६ टक्के होता आणि २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. म्हणजे २०२० च्या निकालाची २०२३ निकालाश जर तुलना केली. तर यंदाचा निकाल ०.५९ टक्क्यांनी वाढलेला दिसतो, असं गोसावी म्हणाले.