हायलाइट्स:
- नितीन गडकरी यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
- रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या शिवसैनिकांची केली तक्रार
- वेळीच हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची केली विनंती
मुंबई: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असंच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामं थांबवावी लागतील,’ असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. ‘महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये म्हणून आपण यात त्वरीत हस्तक्षेप करून मार्ग काढावा,’ अशी विनंतीही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या या पत्राची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. अकोला, नांदेड, वाशिम, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांत किंवा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. तिथं चौपदरीकरण व पूल बांधले जात आहेत. मात्र, या कामात शिवसैनिकांकडून अडथळे आणले जात आहेत. कंत्राटदारांना धमक्या दिल्या जात आहेत,’ याकडं गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.
आपल्या पत्रात नितीन गडकरी म्हणतात…
- अकोला आणि नांदेड या २०२ किमीच्या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाची कामं चार टप्प्यांत सुरू आहेत. यात गेडशी ते वाशिम असं वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचं काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, बायपास व मुख्य रस्त्याचं काम शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी थांबवलं आहे.
- मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेलं आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचं काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळं कंत्राटदारानं काम थांबवण्याची परवानगी मागितली आहे.
वाचा:विजय मल्ल्याच्या ‘किंगफिशर हाउस’चा अखेर लिलाव; मिळाले ‘इतके’ कोटी
- पूलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आम्ही हाती घेतलंय. हे काम जवळपास पूर्ण झालंय. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम शिवसैनिकांनी थांबवलं होतं, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदारानं पुन्हा काम सुरू केलं असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झालं आहे. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं यापुढंही सुरू ठेवावीत का? याबद्दल आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत. ही कामं अर्धवट सोडल्यास वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील.
- हे असंच चालत राहिल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळं महाराष्ट्राचं आणि जनतेचं नुकसान होईल. लोकांच्या दृष्टीने आम्ही अपराधी ठरू. महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायम खंत राहील. ही कामं पुढं नेण्यासाठी आपण हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. यातून कृपया मार्ग काढावा.
वाचा: राज्यपालांना मी ओळखतो, ते जे काही करताहेत ते मनापासून करत नसावेत’