महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आता यापैकी अनेकांना अकरावी, डिप्लोमा आणि आयटीआय प्रवेशांची उत्सुकता लागली आहे. गेल्या वर्षी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्यावर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा उत्तीर्णांचे प्रमाण हे ३.११ टक्क्यांनी कमी असल्याने प्रवेशाचे कटऑफ गुण घटणार असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या निकालात उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ३.८२ टक्क्यांनी अधिक आहे. पुणे विभागाचा निकाल ९५.६४ टक्के लागला.
राज्य मंडळाने २ ते २५ मार्च दरम्यान झालेल्या परीक्षेसाठी १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्याचे प्रमाण ९३.८३ टक्के आहे. अनेक वर्षांनी यंदा पहिल्यांदा दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला.
या वेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी उपस्थित होते. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होती. त्याचा परिणाम निकालावर झाला असून, ९० टक्के आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशासाठी ‘कट ऑफ’ गुण घटणार आहेत. या अभ्यासक्रमांना जागाही मुबलक उपलब्ध असल्याने सर्वांना प्रवेशाची संधी मिळेल.
लातूर पॅटर्नचा बोलबाला
राज्यात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून, त्यापैकी १०८ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ विद्यार्थी आहेत. अमरावतीमधील ७, तर मुंबई विभागातील ६ आणि पुणे विभागातील ५ विद्यार्थी आहेत. त्यामुळे लातूर पॅटर्नचा पुन्हा बोलबाला दिसून येत असून, क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजांमधील ‘इंटिग्रेटेड कल्चर’ सिद्ध होत आहे.
अकरावी, डिप्लोमा प्रवेशांना सुरुवात
पुणे आणि पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावतीमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, https://11thadmission.org.in/ या लिंकहून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात भाग दोन म्हणजेच कॉलेजांचे पर्याय भरण्याची प्रक्रिय़ा सुरू होईल. डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना https://dte.maharashtra.gov.in/ या लिंकहून अर्ज भरता येईल. आयटीआय प्रवेशांना लवकरच सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in/ या लिंकवर माहिती मिळेल