आषाढी वारी 2023: वारीसाठी दिंडीत चालत असताना ‘हा’ अनुभव घ्यावा

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री

बहुतेक विचारवंतांना असं वाटतं, की संत नेहमी शिकवतच असतात. जे विद्वान आहेत, ते म्हणतात संत साधेभोळे असतात. राजकारणी आणि व्यापारी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. सामान्य जनता आशेपोटी आणि भीतीपोटी येते. आपण आपल्या मान्यतेप्रमाणं संतांना मानतो; अथवा मानत नाही. तसा हा व्यक्तिगत विषय आहे. आपली श्रद्धा असते. ती कोणावर आणि कशी ठेवायची, हे आपणच ठरवत असतो. ज्याप्रमाणं हे आपण ठरवतो, त्याचप्रमाणं संत कोण आहेत, हेही आपणच ठरवतो. मौखिक प्रचार, समाजमाध्यमं आणि चमत्कारांच्या कथा, यादेखील कारणीभूत असतात. आपण ऐकून, पाहून मग विश्वास ठेवतो, असं आपल्याला वाटतं; पण ते सत्य नसतं. संतांना ओळखण्याची कुवत आपल्यात नसते. संतांची लक्षणं आपण ठरवतो, म्हणूनच फसतो. खऱ्या संतांना ओळखता आलं असतं, तर ज्ञानोबारायांसह अन्य संतांना झाला एवढा त्रास झाला नसता. गर्भश्रीमंतांनी किती पैसे खर्च करावेत, हे गरीब कसं ठरवणार? त्याचप्रमाणे, ज्ञान कशाला म्हणतात, हे अज्ञानी माणसं कसं सांगणार? त्यांचा आधिकार काय? ज्ञानाविषयी त्याला काय माहिती असणार? आपण अज्ञानी आहोत, याचंच त्याला ज्ञान नाही आणि त्यानं सांगायचं का, की हा संत आहे, हे ज्ञानी आहेत, हे श्रेष्ठ आहेत? या सांगण्यामुळं आणि समजण्यामुळं, खरे संत समजेनासे झाले. ज्यांना समजलं, ते व्यापारी निघाले. अर्थ कमावणाऱ्यांना पारमार्थिक समजलं गेलं. असं असूनही सामान्य लोक सामान्यालाच संत समजून मान देतात.

व्यापक ज्ञानानुभूती हे संतांचं लक्षण आहे. शब्दांतून ती प्रकट होत असते, जी सामान्यांना समजत नाही. अनुभूती समजत नसली, तरी संत सामान्यांची मानसिकता आपल्या अभंगांतून अभिव्यक्त करीत असतात. ‘असो नसो भाव आलो तुझीया ठाया। कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया।।’ हे बोलणं म्हणजे सामान्यांची अभिव्यक्ती आहे. आणखी एक चरण पाहा, जणू आपलं अंत:करणच आपल्याला प्रश्न विचारत आहे, ‘काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी। ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू।।’ जन्माला येऊन मी काय मिळवलं? इतकं आयुष्य खर्ची घातलं, त्यात निष्पन्न काय झालं? अकारण आयुष्य गेलं, हेच सतत आठवतं. भावनात्मक हृदयाची ही अभिव्यक्ती आहे. भगवंताच्या समोर संत आपल्यासाठी अभिव्यक्त होत असतात. मन मोकळं होण्यासाठी हे गरजेचं आहे. घरातील माणसं आपल्याजवळ मन मोकळं करतात. आपण कुठं करावं? पुरुष आहोत, सहज अभिव्यक्त झालं, तर अपमान वाटतो. जखमेनं हृदय भळभळत असतं. सभ्यतेसह अहंकार अभिव्यक्तीला आडवा येतो. भावनिक हृदयाची सभ्य माणसं आतल्या आत गुदमरतात. स्वत:च्या मनाशी बोलतात; पण त्यांना अभिव्यक्त होता येत नाही. भक्ती संप्रदायात आपल्या भावना प्रवाहित करता येतात. संत आपलं मोठेपण सोडून ऐकून घेतात. माऊलीच्या वाणीतील भाव पाहा :

जे हिताहित देखती। हानिकणवा घेपती।
पुसोनि शीण हरिती। देती सुख।। ज्ञा. १३-१०४४

आलेल्या भविकांचं हित पाहतात. समोरच्याचं अहित जाणतात. हानी झाल्यानं हृदय करुणेनं भरून येतं. ‘पुसोनि शीण हरिती’ हे प्रापंचिकासाठी जास्त महत्त्वाचं आहे. शीण देणारे आणि वाढवणारेच जास्त भेटतात. मालिका आणि बातम्या ताणच वाढवत असतात. कायम ताण कसा राहील यासाठीच काहींचा जन्म असतो. माऊली म्हणतात, संत केवळ शीण हरण करतात असं नाही, तर ‘देती सुख’, म्हणजे सुख देणारे असतात. यांना संत म्हणतात. यांचे अभंग ऐकल्यावर ताण कमी होतो. स्वत: अभिव्यक्त झाल्यासारखं वाटतं. वारीसाठी दिंडीत चालत असताना हा अनुभव यायला हवा. संत आपल्याला अभंगांतून जीवनाची जाण आणि आयुष्याचं भान देत असतात. दिलेलं ग्रहण करता आलं पहिजे. ग्रहण केलेलं पचलं पहिजे. पचनासाठी काही कालावधी लागतो. तो कालावधी म्हणजे, वारीसाठी दिंडीत चालणं होय.

Source link

ashadhi waridr namdev shastrireal santsant dnyaneshwarआषाढी वारीआषाढी वारी २०२३न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीपंढरपूर वारीसंतसंत ज्ञानेश्वर
Comments (0)
Add Comment