आषाढी वारी 2023: पंढरपूर दुमदुमलं, ‘पावलो पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा।।’

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री

दशमीच्या दिवशी भूवैकुंठ पंढरपूर, म्हणजे विठुरायाच्या नगरीत प्रवेश होतो. सर्व वारकरी एकमेकांना भेटतात. आलिंगन देतात. ‘भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंद।।’ या अवस्थेची प्रचिती येते. महिन्याचा वारकरी दशमीला पंढरपूर किंवा आळंदीत पोहोचला नसेल, तर इतर वारकरी बांधव त्याचा मृत्यू झाला, असे समजतात. इतर कोणतंही कारण वारकऱ्यांना आडवं येऊ शकत नाही. हा निष्ठेचा, भावनेचा भाग आहे. ‘पावलो पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा।।’ इथं शब्दांचा भाव अगदी वेगळा आहे. पंढरपूरला पोहोचलो असं म्हणत नाहीत, ‘पावलो’ असं म्हणतात. देव पावत असतो, त्याचप्रमाणं ‘पावलो पंढरी’ असा भाव आहे. प्रिय प्राप्त झाल्यावर हदय आनंदित होतं. तसं पाहिलं, तर सर्व जण प्रवासी आहेत. जीवनयात्रा चालू आहे. ध्येय आणि साधना वेगवेगळी आहेत. आपापलं लक्ष्य प्राप्त झाल्यावर आनंद होणारच. पंढरपूर शहर आहे आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. जाणारा प्रवासी कोणत्या भावनेनं तिथं जातो, त्याच्यावर त्याचं फळ आधारित आहे. ‘नेणो ब्रह्म मार्ग चुकले। उघडे पंढरपूरा आले।।’ हा विठोबा नसून पूर्ण परब्रह्म आहे, ही भावना भक्ताची असते. फळ भावनेला आहे, मानण्याला आहे. एका भावनेचा समूह म्हणजे वैष्णव जन. एकमेकांना पाहून आनंद होतो. शीणभाग विचारला जातो. जेवणाचं निमंत्रण देण्यात येतं. एकत्रित भोज होतो; ज्याला पंगत म्हणतात. अभंग म्हणत, विनोद करीत पूर्णब्रह्माचा प्रत्येक घास आनंद देत जातो. या जगण्याचं आधुनिक रूप म्हणजे पार्टी होय. ‘सक्सेस पार्टी’ हा प्रकार अजून वेगळा असतो. नशायुक्त पेय, संगीत, नृत्य, जेवण इत्यादी. विचारशक्ती संपली पाहिजे, असं वातावरण तयार केलं जातं. वारकऱ्याच्या नृत्याला पावली म्हणतात. हे समूह नृत्य असतं. अंगातील रोग घामाच्या रूपातून बाहेर पडतात. विठूनामाच्या गजरात चाललेल्या पावल्यांनी पंढरपूर दुमदुमून जातं. अंगी प्रेमाचं भरतं येतं. चिंता आणि मोह नसल्यामुळं जीवन आनंदानं भरून जातं. ‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया। सुख देईल विसावा रे।।’ प्रत्येक शब्दातील भाव जाणवला पाहिजे. ही वारकऱ्यांची जीवनाबद्दलची मान्यता आहे.

वारीत धर्मिक विधी नसतो. विधीसाठी अन्य तीर्थक्षेत्रं आहेत. आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी वारकऱ्यांचं भजन असतं. दिंडी म्हणजे केवळ प्रदक्षिणा नव्हे, समूहाच्या एकतेचं प्रतीक आहे. एकता किती गरजेची आहे, हे आज माणसाला कळत आहे. श्रीमंत आणि सुशिक्षित माणसं एकटी राहतात; परंतु संकट येतं तेव्हा समूह आठवतो. आनंद वाटल्यानं वाढत असतो, ही समज यायला हवी. कोणतंही कार्य समूहाला जड नसतं. ही सामूहिक एकता माऊलींनी सव्वासातशे वर्षांपूर्वी निर्माण केली. एक देवता, एक निष्ठा, एक तत्त्वज्ञान, एक नामसाधना इत्यादींचा त्यात समावेश केला. दशमी, एकादशीच्या कीर्तनात माऊली स्वत: टाळ घेऊन उभे राहत आणि नामदेव महाराज कीर्तन करीत. पंथ आणि जात दूर सारून सर्वांनी एकत्रित यावं, ही माऊलीची संकल्पना आज साकार होताना दिसत आहे. लाखो लोक पायी चालतात, हा दर वर्षी होणारा विश्वविक्रम आहे. एकत्रिकरणात सिद्धान्ताची बीजं पेरली जातात. एकत्रित राहण्याचा मंत्र दिला जातो. दर महिन्याला वारी जमत नसली, तरी भगवंतमुखातून नामदेव महाराज बोलतात,

आषाढी कर्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गुज पांडुरंग।। नामदेव गाथा

तुकाराम महाराज स्वभिमानानं सांगतात ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ इथं ‘न लगे हिंडणे मुंडणे ते काही। साधनाची नाही आटाआटी।।’ मग वारीत नेमकं काय करायचं? ‘चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा।।’ हे सर्व ताण घेऊन करायचं नाही, तर ‘समाधान चित्ता सर्वकाळ।’ अशी वारी आणि संतसंगती अन्यत्र दुर्लभ आहे, ज्यात ‘लाऊनि मृदंग श्रुती टाळ घोष। सेवूं ब्रह्मरस आवडीने।।’ वारी प्रथम समजावी, मग ती समजून घडावी यालाच भाग्य असं म्हणावं. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार मानतो; ज्यामुळं वारीचं स्वत:सह वैचारिक चिंतन घडलं. संतांचं अंतरंग जगापुढं मांडता आलं. वारकरी अंतरंगातून कसा असतो, हे सांगता आलं. ज्ञान आणि भक्तीनं रंगलेला वारकरी असतो.

Source link

ashadhi wari 2023dr namdev shastriwarkari bhajan kirtanwarkari reached pandharpurआषाढी एकादशी २०२३डॉ. नामदेव शास्त्रीपंढरपूरपंढरपूर विठ्ठल दर्शनवारकरीवारी पंढरीची २०२३
Comments (0)
Add Comment