‘बाईपण भारी देवा’ थिएटरध्ये ५० दिवसांचं यश साजरं करेल, त्यापूर्वी सिनेमाच्या कमाईविषयी एक आनंदाची बातमी केदार यांनी सोशल मीडियावर शेअर केली. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने ७६.०५ कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान रंजक बाब म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी बाईपण भारी देवा’ने ७६ कोटींची कमाई केली. यानंतर दिग्दर्शक, कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
केदार यांनी ही आनंदाची बातमी शेअर करताना अशी कॅप्शन दिली की, ‘भारतमाता की जय! बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.’
‘बाईपण भारी देवा’चे हे ऐतिहासिक यश त्यांनी मायबाप रसिकांच्या चरणी अर्पण करत असल्याचे केदार यांनी या पोस्टमध्ये म्हटले. आता ७६ कोटींचा टप्पा गाठल्यानंतर सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत. शिवाय मराठीमध्ये ‘सैराट’चा असणारा सर्वोच्च कमाईचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ मोडेल का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.