मुंबई विद्यापीठ आणि निकाल गोंधळ हे जणू समीकरणच झाले आहे. एकीकडे मुंबई विद्यापीठाकडून जागतिक विद्यापीठांबरोबर करार केले जात असताना, दुसरीकडे मात्र परीक्षांतील गोंधळ सुरूच असल्याचे दिसत आहे. विद्यापीठाच्या आयडॉलच्या जुलै सत्राच्या एम. कॉम. आणि एम. ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या १० एप्रिलला संपलेल्या परीक्षांचा निकाल तब्बल १४१ दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नाही. तिसऱ्या सत्राचा निकाल लागला नसल्याने जुलैमध्ये पार पडलेल्या चौथ्या सत्राच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊनही विद्यापीठ अंतिम निकाल जाहीर करू शकत नाही. त्यात कहर म्हणजे विद्यापीठाने एम. कॉम. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली आहे. मात्र त्याचवेळी तिसऱ्या सत्राच्या १० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी अद्याप बाकी असल्याने अंतिम निकाल जाहीर करणे शक्य नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यापीठाच्या कंत्राटदाराने उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्याच नसल्याने हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘एम. कॉम. अभ्यासक्रमाची तिसऱ्या सत्राची परीक्षा २८ मार्च ते १० एप्रिलदरम्यान पार पडली. तर, चौथ्या सत्राची परीक्षा ७ जुलै ते २६ जुलैदरम्यान घेण्यात आली. मात्र अद्यापही दोन्ही परीक्षांचा निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला नाही. पीएचडीसाठी त्यातून अडचण येत आहे. तसेच तृतीय सत्रात एखादा विषय राहिल्यास त्याच्या पुनर्मूल्यांकनासाठी आणि पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. त्यातून अडचणीत भर पडणार आहे’, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली.
विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप नित्याचाच झाला आहे. विद्यापीठाने तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचा निकाल लावला नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवून निकाल जाहीर करावा, तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेना (शिंदे गट) उपसचिव सचिन पवार यांनी केली आहे.
याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारणा केली असता मूल्यांकन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.
एम. ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या निकालांना विलंब
विद्यापीठाच्या जानेवारी सत्राच्या एम. ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राची परीक्षा २८ मार्च ते ४ एप्रिल या काळात पार पडली होती. मात्र या परीक्षेला तब्बल १४७ दिवस उलटून गेले तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर, परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असे विद्यापीठाने सांगितले.