बॉक्स ऑफिस स्टॅटिस्टिक्स साइट सॅकनिल्क या चित्रपटाच्या कमाईवर बारीक नजर ठेवून आहे. या अहवालात शेअर केलेल्या सोमवारच्या कमाईचे आकडे चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकतात. पहिल्या सोमवारीच, चित्रपटाने रविवारच्या तुलनेत सुमारे ५० कोटी रुपये कमी म्हणजे ३० कोटी रुपये कमावले आहेत. तर शाहरुख आणि नयनताराच्या या चित्रपटाने रविवारी ८०.१ कोटींची बंपर कमाई करून खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाने ५ दिवसात जवळपास ३१६.१६ कोटींची कमाई करत आपल्या खर्चाचे पैसे वसूल केले.
पहिल्या सोमवारची कमाई
मात्र, पहिल्या सोमवारच्या कमाईबाबत ‘जवान’ची ‘गदर २’शी तुलना केली तर शाहरुख खानच्या चित्रपटाचा पराभव झाला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ने पहिल्या सोमवारी ३० कोटींची कमाई केली होती, तर ‘गदर २’ने ३८.७ कोटींची कमाई केली होती.
पाच दिवसांत ‘जवान’ची जगभरातून कमाई
‘जवान’च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली, तर ५ दिवसांत ५५० कोटींचा आकडा पार केला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत जगभरात ५२०.८० कोटींची कमाई केली आहे. ४ दिवसांत देशभरात एकूण ३४३.८० कोटी रुपयांचे कलेक्शन झाले, तर परदेशातही चित्रपटाने चांगली पकड ठेवली आहे. या चित्रपटाने ४ दिवसात परदेशात १७७.०० कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटात दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील उत्कृष्ट कलाकारांचा समावेश
शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू अशा ३ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. अॅटलीने त्यांचा चित्रपट जवळपास ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला आहे. चित्रपट आपल्या खर्चापेक्षा अधिक नफ्याच्या आकड्याकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसते. शाहरुख, नयनतारा आणि विजय सेतुपती व्यतिरिक्त या चित्रपटात सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सुनील ग्रोवर, प्रियामणी असे अनेक कलाकार आहेत. प्रेक्षकांपासून ते इंडस्ट्रीतील दिग्गजांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे भरपूर कौतुक करताना दिसत आहे.