मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नीतिन आरेकर यांनी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि वक्तृत्वाचा आढावा घेतला. बाळासाहेबांची कणखर आणि ओजस्वी भाषा त्याचबरोबर लोकांच्या हृदयाला हात घालून बोलण्याची निस्पृह शैली यामुळे त्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले असल्याचे डॉ. नीतिन आरेकर यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी वक्तृत्व कला विकसीत करण्यासाठी चौफेर वाचन करणे आणि वक्तृत्वाचा रियाज करणे आवश्यक असून त्यासाठी त्यांनी शब्दकोश वाचावे असेही सांगितले. वक्तृत्व कलेचा विकास करण्यासाठी वक्तृत्व हे संवेदनशील, विषयाची सर्वांगीण मांडणी करणारे आणि अभ्यासू असावे असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. वक्तृत्वाचा विकास करण्यासाठी आत्मविश्वास ही गुरुकिल्ली असून श्रोत्याला आपले म्हणणे पटवून देण्याची क्षमता वक्त्याने अंगी बाळगावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान लाभले आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या ओजस्वी, निर्भिड वाणीने आणि वक्तृत्वाने अनेक सभा गाजविल्या आहेत. विविध विषयावर त्यांनी परखड भाष्य केले आहे. बाळासाहेबांनी जनसामान्यांतून नेतृत्व उभे केले आहे. अशा अनेक विविधांगी पैलूंचा सर्वंकष अभ्यास व्हावा यासाठी या अध्यासन केंद्राची भूमिका अधोरेखित होणार आहे. याअनुषंगाने या केंद्राच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. अशा पद्धतीच्या कार्यशाळेच्या माध्यमातून वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकासाला मोठा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या मार्फत नजीकच्या काळात लीडरशीप डेव्हलपमेंटबाबत काही अभ्यासक्रम सुरु करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.