जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात मालमत्ता करवसुलीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला उपायुक्त तथा करमूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकारी, वसुली कर्मचारी उपस्थित होते. करवसुलीचा आढावा दररोज स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाकडून घेतला जातो. त्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज केलेल्या करवसुलीची माहिती द्यावी लागते. अनेक कर्मचाऱ्यांच्या नावापुढे शून्य करवसुली झाली, असा उल्लेख आढाव्यासाठीच्या अहवालात दिसून आल्यामुळे जी. श्रीकांत संतापले. त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांसह करवसुलीसाठीच्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
वॉर्ड कार्यालयांच्या करवसुलीची सरासरी केवळ आठ ते अकरा टक्के आहे , हे प्रमाण फारच कमी आहे. मार्च अखेरपर्यंत ३०० कोटींपर्यंत करवसुली झाली पाहिजे. यासाठी नियोजन करून काम करा. कामात सुधारणा करा, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. शून्य करवसुलीचा उल्लेख यापुढे ज्यांच्या नावासमोर दिसेल, त्यांना पगार मिळणार नाही. ज्या दिवशी कर वसुली नाही, त्या दिवशीचा पगार नाही असे प्रशासकांनी स्पष्ट केले. कामात सुधारणा झालीच नाही तर एक नोटीस देऊन बडतर्फ केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
पालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. जे मालमत्ताधारक वारंवार नोटिस बजावून देखील कर भरत नाहीत त्यांची मालमत्तांना टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर नोटीस बजावून त्या मालमत्तेचा लिलाव करा, असे आदेश प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिले.
Read Latest Maharashtra News And Marathi News