इतरांचं लय वर्ष ऐकलं. आता तुम्ही माझं ऐका. तुम्हाला असं काय करून दाखवतो. असं म्हणत काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो. उमेदीचा काळ असतो. मधला काळ असतो. आम्ही वरिष्ठांना सगळ्यांना सांगितलं. आतापर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलो. जिल्हा, तालुका राष्ट्रवादीमय कसा राहील. या सगळ्या गोष्टी करत आलो. मी एक आठवण तोंडपाठ आहे म्हणून सांगतो १९६७ नवीन नेतृत्व या ठिकाणी आलं. तेव्हा ते १७ हजारांनी निवडून आलं. १९७२ साली ३४ हजारांनी निवडून आलं. १९७८ ला १८ हजारांनी निवडून आलं. १९८० ला २५ हजारांनी निवडून आलं. ८५ ला विरोधक केवळ १८ हजारांनी पडले. १९९० माझ्यासारखे तरुण काम करू लागल्यावर १ लाखाने जागा निवडून आली. त्यानंतर आम्ही कधीच मागेपुढे बघितले नाही. त्यानंतर सतत लाखांच्या पुढेच लीड गेलं, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
वेगळी भूमिका घेतल्याच्या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, याबाबतची भूमिका घेत असताना वर्षभर चर्चा चालू होत्या. आज जवळपास ५३ पैकी ४३ आमदार येतात. २ अपक्ष आमदार पाठिंबा देतात. विधान परिषदेचे ६ आमदार येतात याचाच अर्थ मी घेतलेली भूमिका बरोबर आहे. म्हणूनच हे सर्व माझ्याबरोबर येतात. कोणालाही दमबाजी मी केली नाही, असं म्हणत अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले.
प्रत्येकाचा एक काळ असतो. जास्त वय झाल्यानंतर तुम्ही आराम करा. आशीर्वाद द्या. तुमच्या अनुभवाचा आम्हाला सल्ला द्या, असं म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांना सर्वांनी मन लावून एकजुटीने काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. तसेच जीवाला जीव देणारे माझे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सुखदुःखात नेहमीच मी सहभागी असतो. हे चांद्यापासून बांधापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. अशा कार्यकर्त्यांना मी कधीच अंतर देत नाही.