केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत देशमुख यांच्यावरील आरोपात काही तथ्य नसल्याचं वाटत असल्याचे सुचविणारी ‘पीडीएफ’ समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहे. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर देशमुख यांच्यावरील आरोपांत काहीच तथ्य नसल्यानं चौकशी बंद करण्याची शिफारस केल्याचा दावा यामध्ये करण्यात येत आहे.
वाचाः अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चीट?
या कथित अहवालामुळं राजकीय क्षेत्रात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या एका जुन्या ट्विटचाही संदर्भ दिला आहे. पवार यांनी म्हटलं आहे, ‘सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो.’ असं पवार यांनी म्हटलं आहे.
यासोबत त्यांनी एका जुन्या ट्विटचा संदर्भ दिला आहे. देशमुख यांच्यासंबंधी दाखल एका याचिकेत कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं होतं, ‘करोनाच्या संकटात गृहमंत्री म्हणून पोलीस दलाचं मनोधैर्य वाढवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम आपण केलंत. पण आज माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत आपण राजीनामा दिला. वास्तविक आपल्यावरील आरोप हे एक राजकीय षडयंत्र असून या अग्निदिव्यातून आपण यशस्वीपणे बाहेर पडाल, असा विश्वास आहे.’ असं त्यावेळी पवार यांनी म्हटलं होतं. आता यासंबंधीचा कथित अहवाल व्हायरल झाल्यावर पवार यांनी या जुन्या ट्विटचा संदर्भ देत नवीन ट्विटही केलं आहे. त्यामुळं या अहवालाच्या खरेपणाबद्दल पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
वाचाः गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय?; ‘हे’ नियम बंधनकारक