सोमवारी येवला विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध केला का, असा सवाल उपस्थित करीत भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची आपली भूमिका आजही ठाम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की आणखी कुठल्याही अनेक नेत्यांनी देखील अशीच भूमिका व्यक्त केली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असेल तेथे कुणाला आत घेतले जाते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात ओबीसींमध्ये ३७४ जातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी समाज बांधव आहेत. ओबीसींमध्ये अनेक जातींचे लोक गरीब आहेत. ओबीसींना मंडल आयोगाचे आरक्षण मिळाले ते तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मान्य केले. महाराष्ट्रात शरद पवार यांनी, तर इतर राज्यात इतर लोकांनी त्याची अंमलबजावणी केली. आता केवळ मलाच टार्गेट का केले जातेय, असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते स्वतंत्रपणे द्यावे, अशी भूमिका त्यांनी येवल्यात पुन्हा मांडली.
‘ईडब्ल्यूएस’ मिळाल्यास वातावरण निवळेल
ईडब्ल्यूएस गुजरातमध्ये लागू झाले तेव्हा तेथील पाटीदार पटेल समाज शांत झाला. ईडब्ल्यूएसच्या १० टक्के आरक्षणात विविध राज्यांत अनेक समाज गेल्याने तेथील आंदोलन शांत झाले आहे. महाराष्ट्रातही ईडब्ल्यूएस आरक्षणात साडेआठ टक्के म्हणजे ८५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. हे दहा टक्के आरक्षण मिळाल्यास येथील वातावरणही निवळेल अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News