याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. कोयता हल्ला होत असताना महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे.
ही घटना दि. २४ रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास वडगाव शेरी भागात घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीन सराइतांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टूणटूण चव्हाण (वय १८), आकाश भरत पवार (वय २३), अमोल वसंत चोरघडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षत तापकीर, राहुल बारवसे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनुज, हरिकेश आणि आकाश सराइत गुन्हेगार आहेत. सौरभ संतोष पाडळे (वय २२ रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाशशी भांडण झाले होते. वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात आला होता. त्यावेळी आकाशने सौरभला मारहाण केली. अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवागाळ केली. यांना जिवंत सोडून नका, असे सांगून त्यांनी दगड फेकून मारले. सौरभचा मित्र अभी आगरकर आणि योगेश ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.