शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी जागावाटपाबाबत भूमिका जाहीर केली. या वेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २३ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. राऊतांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरोध केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पक्षातील नेते मंडळीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. अद्याप कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. कोणतेही जागावाटप अंतिम झालेले नाही. जास्तीत जास्त जागा लढण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त करण्यात काहीही गैर नाही. प्रत्येक पक्षाला वाटते आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात,’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही याबाबत नाराजी जाहीर केली. ‘गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात जे काही घडले ते दुर्भाग्यपूर्ण आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मते आहेत. हे सांगणे कठीण आहे. असे असतानाच जागेबाबत दावा करणे चुकीचे असल्याचे आहे,’ असे मत निरुमप यांनी व्यक्त केले.
‘पक्ष फुटीवरून जागावाटप ठरत नाही’
आमचा पक्ष फुटला की नाही हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार, खासदार निवडून येतात, निघून जातात; पण त्यांना निवडून देणारा, पक्षाला मानणारा मतदार हा तिथेच आहे. शिवसेनेने आतापर्यंत कायम २३ जागा लढल्या असून, १८ खासदार निवडून आले आहेत. त्यातील काही निघून गेले असले तरी पक्षफुटीवरून जागावाटप ठरत नाही, अशा शब्दात शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले. मात्र, काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचवेळी २३ जागांबाबत आपण ठाम असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News