गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ देशात सर्वसामान्य जनतेला रेशनवर स्वस्त धान्य वितरित केले जाते. याचा लाभ देशातील जवळजवळ पंधरा कोटीपेक्षा अधिक जनतेला होत आहे. निवडणुकीत मतावर डोळा ठेवून अशा दुकानांतून अधिकाधिक वस्तू देण्याची घोषणा होत आहे. मात्र, वितरकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पूर्वी या वितरकांना चांगले कमिशन आणि वरकमाई होत होती. आता मात्र, विक्री ऑनलाइन झाल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. फाइव्ह जी च्या जमान्यात टूजी ची सुविधा असलेल्या पॉश मशीन, एक देश, एक रेशन उपक्रमासाठी नसलेली सुविधा, तुटपुंजे कमिशन, इतर वस्तू विक्रीसाठी नसलेली परवानगी, वाढत असलेले लाभार्थी, अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप, आनंदाचा शिधा सारखे सततचे नवनवीन योजना या सर्व पार्श्वभूमीवर दुकानदारांच्या पदरात फारशे काही पडत नसल्याने ते अस्वस्थ आहेत.
सरकारच्या पातळीवर आपल्या मागण्यासाठी दुकानदारांनी अनेकदा मागण्या, आंदोलन केले. त्याची दखल न घेतल्याने अखेर देशव्यापी विक्री बंदचे हत्यार उपसण्यात आले आहे. एक जानेवारीपासून देशातील सर्व यामुळे दुकाने बंद राहणार आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून रेशनवरील धान्य मिळणार नसल्याने जनतेलाही त्याचा फटका बसणार आहे.
रेशन दुकान
भारतातील दुकाने : ५ लाख ३८ हजार
महाराष्ट्रातील दुकाने : ५३ हजार
देशातील लाभार्थी : १४ कोटी
महाराष्ट्रातील लाभार्थी : १ कोटी ६४ लाख
एका दुकानाचे लाभार्थी : ५०० ते ६००
मिळणारे कमीशन : १०० किलो विक्रीला १५० रू.