राज्य सरकारचा महिला व बालविकास विभाग, तसेच ‘युनिसेफ’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, बीड, हिंगोली, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, परभणी व सोलापूर या बारा जिल्ह्यांमध्ये बालविवाह थांबविण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल काम करणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे, त्या जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ‘रासेयो’अंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची सूचना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार आता संबंधित विद्यापीठांमार्फत याबाबत नियोजन करण्यात येत आहे. ‘रासेयो’ शिबिरांसाठी दरवर्षी एका गावाची निवड केली जाते. या गावांमध्ये ‘रासेयो’ स्वयंसेवक सात दिवस श्रमदान देतात. या सात दिवसांच्या शिबिरात स्वयंसेवकांना संबंधित गावांमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती करावी लागणार आहे. पथनाट्य, भारुड, एकांकिका असे जनजागृतीपर कार्यक्रम स्वयंसेवकांना यादरम्यान राबवावे लागणार आहेत.
ग्रामस्थांसाठी बौद्धिक सत्र
या शिबिरांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासोबतच ग्रामस्थांसाठी बालविवाह थांबविण्यासाठी एक दिवसाचे बौद्धिक सत्र आयोजित करावे लागणार आहे. अशा बौद्धिक सत्रांमध्ये राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज या संस्थेचे कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात ३० टक्के
नाशिक जिल्ह्यात दरवर्षी ३० टक्के बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले होते. त्याचसोबत आता ‘रासेयो’ शिबिरांमध्येदेखील जनजागृती केली जाणार आहे.
‘रासेयो’मार्फत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. फेब्रुवारीपर्यंत ही शिबिरे सुरू राहणार आहेत. यंदाची शिबिरांची थीम लोकसंख्या नियंत्रण आहे. अद्याप विद्यापीठामार्फत बालविवाह रोखण्यांसदर्भातील उपक्रमांबाबत प्रत्यक्ष सूचना मिळालेल्या नाहीत. सूचना मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाईल.-गोरख पिंगळे, जिल्हा समन्वयक, ‘रासेयो’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ