पांढऱ्या पेशी अन् मधुमेह नियंत्रणासाठी ‘हे’ हर्बल चॉकलेट उपयुक्त; नाशिकच्या विद्यार्थिनींचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शरीरातील पांढऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पपईचे पान आणि मधाच्या अर्काचे चॉकलेट बनवून वेगळा पर्याय महावीर शिक्षण संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपलब्ध करून दिला आहे. पायल चोपडे व तेजस्विनी देशमुख या फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी हे संशोधन केले आहे. लवकरच पेटंटसाठीही प्रयत्न करणार आहेत.

आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी संसर्गजन्य रोग आणि बाह्य हानिकारक प्रभावांपासून आपले संरक्षण करतात. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते. या संशोधनासाठी महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव आणि विभागप्रमुख डॉ. अतुल बेंडाळे यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभले. या संशोधनाबद्दल ‘आविष्कार-२०२३’ या आंतरविद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत दोघींना पारितोषिक व पदकही प्राप्त झाले आहे.

– पपईच्या पानांमध्ये एसिटोजेनिन्स असतात, जे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढविण्याचे काम करतात
– त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून डेंग्यू, मलेरियासारख्या तापावरही पपईची पाने फायदेशीर
– परंतु, पपईच्या पानांचा रस कडू असल्याने बऱ्याचदा रुग्णांना हा रस आवडत नाही
– याचा विचार करून पायल व तेजस्विनी यांनी त्यावर उपाय शोधला
– पपईचे पान आणि मधातील रोगप्रतिकारक गुणधर्म पारखून त्यांना एकत्रित करीत त्यांनी चॉकलेट बनविले
– मधामुळे पपईच्या पानाचा कडवटपणा जाणवत नाही
– त्यामुळे रुग्ण सहजपणे या चॉकलेटचे सेवन करू शकतात
– विद्यार्थिनींनी बनविलेले ‘हर्बल डब्लूबीसी बार विथ चॉकलेट’ पांढऱ्या पेशी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार

पपईचे सेवन या आजारातील व्यक्तींनी केल्याने शरीरीवर दुष्परिणाम होतील

…अशी सुचली कल्पना

पायल चोपडे हिच्या भावाला सप्टेंबरमध्ये डेंग्यूची लागण झाली. त्यावेळी पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्या वाढविण्यासाठी त्याला पपईच्या पानांचा रस देण्यात आला. परंतु, कडू चवीमुळे तो हा रस फारसा घेऊ शकला नाही. त्यानंतर पायल आणि तेजस्विनी यांनी पपईच्या पानाचा रस, मध, वॅफल आणि सॅकरीन यांचा वापर करून हा ‘हर्बल डब्लूबीसी चॉकलेट बार’ बनविला. अवघ्या दोन ते तीन महिन्यांत त्यांनी या कल्पनेला मूर्त रूप दिले. साखर न वापरता सॅकरिन वापरल्याने मधुमेही व्यक्तींसाठीही हे चॉकलेट उपयुक्त ठरणार असल्याचा दावा पायलने केला आहे.

Source link

Herbal ChocolateHerbal WBC Bar with ChocolateMahavir InstituteMahavir Institute of Pharmacy nashikNashik newswhite cell countWhite cell infectious diseases
Comments (0)
Add Comment