जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत सीएमआयएस हे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. सीएमआयएम हे मोबाइलवरही उघडता येणार आहे. या सॉफटवेअर मध्ये मालाविषयक, शरिराविषयक, जुगार, वाळू व दारू विषयक आरोपी, गुन्हेगार, फरार, पाहिजे याची अद्ययावत माहिती प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी ही आधुनिक यंत्रणा अंमलात आणली जात आहे.
या तंत्रज्ञानात १४ हजार ७६० आरोपींची माहिती भरण्यात आली आहे. या माहितीमध्ये आरोपींवर असलेले गुन्हे, त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती देण्यात आली आहे. यामुळे नाकाबंदी किंवा विशेष तपास अभियानाद्वारे आरोपींची माहिती अॅपवर उपलब्ध होत आहे. ही माहिती अनेक पोलिसांनी डाउनलोड केलेली आहे. सीएमआयएसमध्ये अजुनही गुन्हेगारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई शक्य होणार आहे.
अशी असेल माहिती
– गुन्हेगारांची यादी, सद्यस्थिती, इतर माहिती
– आरोपींची डिजिटल क्रिमीनल फोटो
– घटकनिहाय व गुन्हे पद्धतीची माहिती
– तडीपार गुन्हेगारांची माहिती
– फरार आरोपींची यादी
कारवाई करणे होणार सोपे
अनेकदा एका भागातील आरोपी हे दुसऱ्या भागात फिरत असतात. पोलिसांना माहिती नसल्याने त्याच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई करणे सोपे होणार आहे.