अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड मतदार संघामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी याठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरु होताच बसण्याच्या मुद्द्यावरुन प्रेक्षकांमध्ये वादावादी सुरु झाली, त्याचे रुपांतर हुल्लडबाजीत झाले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी स्टेजवर येत हुल्लडबाजांना चांगलाच दम भरला. जे कार्यक्रम पाहण्यासाठी आले आहेत, त्यांनी शांत बसा. दुसऱ्या गटातून जे कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी आले आहेत, त्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकावे. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. मात्र, त्यापेक्षा अब्दुल सत्तार यांनी वापरलेली खालच्या दर्जाची भाषा हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम ?, असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. यावर आता अब्दुल सत्तार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.