बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ द्या, भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाही : संजय राऊत

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशातील तीनशे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. तर १५० ते १७५ जागांवर प्रादेशिक पक्ष विरुध्द भाजप अशी लढत होईल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी केला. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाही असे ते म्हणाले.

संजय राऊत यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, येत्या दोन – चार दिवसात दिल्लीत जाऊन आम्ही काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा करुन जागा वाटपाचा अंतिम मसुदा ठरवणार आहोत. लोकसभेच्या ५४३ जागांचे गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे. २०२४ मध्ये या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन नक्की होईल. भाजप मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास का घाबरत आहे असा सवाल त्यांनी केला.

ईव्हीएमच्या मुद्यावरुन उद्या जनता रस्त्यावर उतरली आणि अराजक माजले तर त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी दिला. मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास भाजपला नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणूक देखील जिंकता येणार नाही असे राऊत म्हणाले.

जागा वाटपाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर देखील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही असे सूचक विधान देखील त्यांनी केले.

‘दहा दिवसात राज्यात भूकंप होणार’ असे विधान भाजपच्या एका मंत्र्याने केले आहे, या बद्दल राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत जनताच भूकंप घडवून भाजपला घरी बसवेल. ईडी, सीबीआयचा वापर करुन धाडी टाकणे याला भूकंप म्हणत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

Source link

india allianceindia alliance seat sharingSanjay RautShivsenaइंडिया आघाडीइंडिया आघाडी जागा वाटपशिवसेनासंजय राऊत
Comments (0)
Add Comment