आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे. अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News