गुरुवारी लोकल ट्रेनमध्ये, घरांमध्ये पुन्हा एकदा पंख्याचा वेग वाढला होता. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर गुरुवारी कमाल तापमान २४ तासांमध्ये अनुक्रमे २.८ आणि ३.३ अंशांनी वाढले. हे तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा सांताक्रूझ येथे २.४, तर कुलाबा येथे २.३ अंशांनी नोंदले गेले. मुंबईच्या कमाल तापमानासोबत किमान तापमानातही वाढ झालेली आहे. कुलाबा येथे २३.२, तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान गुरुवारी नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे ३.८, तर सांताक्रूझ येथे ६.३ अंशांनी अधिक होते. सध्या राज्यभरात वाऱ्यांची दिशा दक्षिण आणि आग्नेयेकडून आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तामपानात वाढ झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. ही वाढ उद्या, शनिवारपर्यंत कायम राहू शकते असा अंदाज आहे. या वाऱ्यांमुळे कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सध्या थंडीचा ऋतू असूनही उकाडा जाणवू शकतो.
गुरुवारपासून राज्यावरील प्रणाली निवळू लागल्याने हळूहळू किमान तापमानात घट होईल, असा अंदाज आहे. आज, शुक्रवारपासून धुकेही अनुभवायला येऊ शकते. तसेच आकाशही निरभ्र असेल. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा ३ ते ८ अंशांपर्यंत चढे आहे. मालेगावात गुरुवारी किमान तापमान सरासरीपेक्षा ८.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. मराठवाड्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा २.५ ते ५ अंशांनी जास्त आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात सरासरीहून किमान तापमान अधिक असले तरी किमान तापमानाचा पारा २० अंशांहून कमी आहे. कोकणात मात्र हा पारा २० अंशांहून अधिक आहे. पुढच्या आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर थंडीची जाणीव पुन्हा होऊ शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.
सर्वाधिक तापमान रत्नागिरीत
राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल आणि किमान तापमान रत्नागिरी येथे नोंदले गेले. रत्नागिरी येथे कमाल तापमानाचा पारा ३४.२ होता, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस होते. गोव्यात पणजी येथे कमाल तापमानाचा पारा ३५.२ अंश सेल्सिअस होता. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सध्या मोठी वाढ झाली आहे.