मी नाकारलेला मुख्यमंत्री नाही, आजही मध्य प्रदेशात…; शिवराजसिंह चौहान यांचे सूचक वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मध्य प्रदेशात यंदा भाजपची सत्ता जाणार, अशीच चर्चा रंगवली जात होती. विरोधी पक्षाचे नेते सोडा; पण काही भाजपचे नेतेही सरकार येणार नाही, असेच सांगत होते. भाजपचे सरकार येणार, हा ठाम विश्वास मला होता. मी ठरवले आणि फक्त सरकार आणले नाही, तर आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा मिळवत आमचा विजय झाला. मी मुख्यमंत्री नसलो तरी नाकारलेला नाही. आजही मध्य प्रदेशात ‘मामा’ तेवढाच लोकप्रिय आहे,’ असे सांगून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी अनेक सूचक विधाने केली.

‘मी पदासाठी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे मी राजकारण सोडले, असे समजू नका. मला देशासाठी अजून मोठे काम करायचे आहे,’ असे स्पष्ट करून केंद्रीय राजकारणातही रस असल्याचे संकेत त्यांनी दिले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकसत्ता पक्षाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण, डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड आदी या वेळी उपस्थित होते.

चौहान यांनी छात्र संसदेच्या तरुणांशी संवाद साधताना मध्य प्रदेशातील राजकारणावर प्रकाश टाकला. ‘मध्य प्रदेशातील महिलांना पुरुषांच्या समान वागणूक द्यायला सुरुवात केल्याने त्या राज्यात मोठे बदल घडले. महिलांसाठीच्या योजनांमुळे राज्यातील पुरुष-महिला प्रमाणातही समतोल साधला जाऊ लागला. महिलांच्या खात्यात पैसे जात असल्याने त्यांचा वैयक्तिक विकास होऊन पुरुषांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. ‘लाडली बेटी’ योजनेतील लहान लहान मुली आज उच्च शिक्षण घेताना पाहतो, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो,’ असे चौहान यांनी सांगितले. या प्रयत्नांमुळेच निवडणुकीच्या सगळ्या विश्लेषकांना चूक ठरवून मी मध्य प्रदेशची सत्ता आणली,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राचा डंका, महाराष्ट्र ठरले देशातील सर्वात स्वच्छ राज्य
‘तरुणांनो, राजकारणात या’

चौहान म्हणाले, ‘तरुण मुलांनी राजकारण आपले क्षेत्र नाही, असे समजू नये. अजून किती दिवस तुम्ही चोरी करणाऱ्यांच्या, धनाढ्यांच्या, पैसे खाणाऱ्यांच्या हातात राजकारण देणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकारणातून पैसा घालवायचा असेल तर सुशिक्षितांना राजकारणात यावेच लागेल. त्यामुळे तरुणांनो राजकारणात येण्यासाठी मागेपुढे पाहू नका.’

मोफत शिक्षणासाठी प्रयत्न करणार

‘देशातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा अधिकार आहे. आणि त्याला ते मोफतच मिळाले पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणूनच देशभरातल्या मुलांना सर्वप्रकारचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे,’ असे चौहान यांनी स्पष्ट केले.

Source link

BJP newsPune newsshivraj singh chauhanshivraj singh chauhan speechमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
Comments (0)
Add Comment