या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्ताने सरपंच बापूराव काकडे व पालक हजर होते.यावेळी जयंती साजरी करताना पोषण आहार घेऊन ठेकेदारांची गाडी आली. त्यांनी पोषण आहार शाळेत उतरवला.. अचानक सरपंच बापू काकडे,पालक माधवराव तायडे,प्रकाश काकडे,ईश्वर काकडे,गजानन काकडे,लतीफ शहा, गणेश काकडे यांनी शाळेत जाऊन आलेला पोषण आहार तपासाला. आता त्यात चक्क अळया व उंदराच्या लेंडया असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनी वरून माहिती दिली.त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप सरपंच बापूराव काकडे यांनी केला आहे.
वांगी बुद्रुक येथे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असून येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहे.यात १३३ विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेत आहे.हा निकृष्ट दर्जाचा आहार खाऊन जर विद्यार्थ्यांना विष बाधा झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल यावेळी पालकांनी शिक्षकांना केला.यावेळी पालकांनी राडा घातला.
आहार बदलून देऊ
सदर पोषण आहार हा ठेकेदार पुरवठा करतो यांच्याशी आमचा संबंध नसतो. आज पुरवठा झालेल्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या असल्याची तक्रार आली आहे. संबंधित ठेकेदाराला कळवले आहे, त्यांनी तो आहार बदलून देतो, असे सांगितले आहे. तो आहार बदलून दिला जाईल तो आहार वापरू नये अशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत, असं सिल्लोडचे शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांनी म्हटलं.
मुलांच्या जीवाशी खेळ..
हल्ली शाळांना पुरवठा केला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा येत आहे.काही दिवसांपूर्वी धोत्रा येथील पोषण आहारात तर चक्क मेलेला उंदीर निघाला होता. वांगी बुद्रुक येथील आहारात चक्क अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषी विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वांगी बुद्रुकचे सरपंच बापूराव काकडे यांनी केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News