रौनक रेसीडन्सी नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरु आहे. इमारत उभारण्यासाठी लोखंडी सळ्या लावण्यात आल्या आहेत. या लोखंडी सळ्यांवर एक १९ वर्षांचा तरुण इतक्या जोरात पडला की एक सळई थेट त्याच्या कंबरेखाली घुसली आणि दुसऱ्या पायाच्या जांघेतून बाहेर पडली. या दुर्घटनेनंतरही तरुण शुद्धीत होता. जरा पुढे मागे झालं असतं तर या तरुणाला जीव गमवावा लागला असता.
रविवारी (१४ जानेवीर) रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. रौनक रेसीडन्सीच्या निर्माणाधीन साईटवर सुरक्षारक्षकाला एक तरुण हा लोखंडी सळ्यांवर पडलेला दिसून आला. या तरुणाच्या डाव्या बाजूने कमरेखालून ही सळई घुसली ती मांडीमधून बाहेर पडली. मग उजव्या बाजुच्या जांघेतून शिरुन बाहेर पडली होती. सुरक्षारक्षकाने हे पाहताच लगेच इतर कामगारांना तिथे बोलावलं. त्यानंतर कामगारांनी प्रसंगावधान दाखवत ग्राईंडरच्या मदतीने तरुणाच्या शरीरात घुसलेली सळई ही मुख्य साच्यापासून वेगळी केली. त्यानंतर या तरुणाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हा तरुण या ठिकाणी कामगार म्हणून काम करत नसल्याची माहिती सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. जर तो तरुण तिथे काम करत नव्हता तर तो तिथे काय करत होता असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरुणावरील उपचार झाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करतील.
Read Latest Maharashtra News And Marathi News