तलाठी भरतीबाबत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; नोकरी विकली जातेय- विद्यार्थ्यांचा आरोप, एसआयटी चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर: परीक्षा तुम्ही घेतली, उत्तरपत्रिका, उत्तरसूची तुमच्याकडे कॅमेरा तुमचा,डिव्हीआर तुमच्याकडे आणि पेपर फुटल्याची पुरावे विद्यार्थ्यांना मागता? राजकारण कशाला करता, असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला केला. तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळाबाबत सवाल करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले. परीक्षा, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच उतरायचे का, असा सवाल करत तलाठी भरती प्रक्रिया रद्द करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. नोकरी विकली जात आहे, तुमचे कार्यकर्ते दहा-वीस लाख रुपये घेऊन मुलांना पास करून देतात त्यांना आवरा, अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळावरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.विद्यार्थी कृती समितीने ठिय्या आंदोलनाची हाक दिली. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी तलाठी, पोलिस भरतीसह विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ मांडला. बहुतांशी विद्यार्थिनीने तलाठी भरतीवरुन सरकार पुरावे मागत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

सर्वकाही सरकारकडे असताना सरकार आम्हालाच पुरावे मागते आहे. तलाठीसह सारथी, बार्टी, महाज्योती प्रवेशपूर्व परीक्षेतील गोंधळाचा उल्लेख करत परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. परीक्षा, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच उतरायचे का, आंदोलनच करायचे का असा सवाल ही विद्यार्थ्यांनी केला. आमचे आई-वडिल शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून आम्हाला शिकवता याची जाणिव आम्हाला आहे. परीक्षेत तुम्ही तुमचे कार्यकर्ते लावता. दहा, वीस लाख रुपये वसूल करता आणि मुलांना पास करून देता, आरोपही विद्यार्थ्यांनी केला. यावेळी प्रा. एच. एम. देसरडा, प्रा. विठ्ठल कांगने, कृती समितीचे प्रकाश उजगारे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पाणबुडे आदींची उपस्थिती होती.

एसआयटी चौकशी करा

तलाठी परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटीमार्फेत चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. तलाठी भरती रद्द करत भरती नव्याने घ्या, एक महिन्यात निकाल जाहीर करा. परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी प्रा.विठ्ठल कांगने यांनी केली. ते पुढे म्हणाले, पेपर फुटला तलाठी भरतीचा. आम्ही आरोप केला तलाठी भरतीचा आणि उत्तर देत आहेत, गृहमंत्री. संबंधित खात्याचे मंत्री, अधिकाऱ्यांनी उत्तरे द्यायला हवेत असे विद्यार्थी म्हणाले. गृहमंत्री यांनी पोलिसभरती लवकर जाहीर करावी. पहिले लेखी का मैदान, वयोमर्यादाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. प्रा. देसरडा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अशा आहेत मागण्या..

तलाठी भरतीच्यावर एसआयटी चौकशी नेमण्यात यावी, टीसीएस, आयबीपीएस ऑनलाइन परीक्षा नकोच, इथून पुढचे सर्व पेपर्स एमपीएससीमार्फत घेण्यात यावे, परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात यावी, भरती संदर्भात ज्या बातम्या आल्या त्याचा योग्य खुलासा करण्यात यावा. दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी.

Source link

sit inquiry regarding talathi recruitmentstudentsएसआयटी चौकशीची मागणीतलाठी भरतीशेकडो विद्यार्थी रस्त्यावर
Comments (0)
Add Comment