जिल्हातील गोंडपिंपरी उपविभागातील पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. वीजबिलाचे सहा लाख १३ हजार ८०७ रुपयाचे देयक न भरल्याने महावितरण कंपनीने ही कार्यवाही केली आहे. या पाचही योजनेतून तालुक्यातील तीस गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या गावांतील नागरिकांवर ओढावली आहे. ज्या पाच योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यात चेकबापूर -चेक नांदगाव योजनेचा समावेश आहे. या योजनेतून सात गावांना पाणीपुरवठा केला जातो. सकमूर, चेकबापूर, गुजरी, चेक नांदगाव, हेटी नांदगाव, कुडे नांदगाव, टोले नांदगाव या गावांचा समावेश आहे.
या सात गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. पाणी पुरवठा बंद असल्याने सात गावातील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली. या बिकट स्थितीत सरपंचा अर्पना रेचनकर, सदस्य अशोक रेचनकर यांनी सात गावांची तृष्णा भागविण्यासाठी धावून आलेत. वर्धा नदीच्या पात्रात योजनेची विहीर आहे. इथून योजनेत पाणी पुरवठा केला जातो. इथला विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या विहिरीच्या काही अंतरावर रेचनकर यांच्या मालकीची दहा एकर शेती आहे. शेतात मिरची, वांगे, टमाटरचे पीक उभे आहे. रोज शेतीला पाणी करावे लागते. मात्र सात गावाची तहान भागविण्यासाठी रेचनकर यांनी शेतीच्या सिंचणासाठी असलेल्या विदयुत पुरवठा, योजनेचा मोटारपंपाकडे वळता केला. यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी शेतीला मोठा फटका बसला आहे. शेत कोरडे पडले आहे. पीकं करपत आहेत. गावासाठी शेतीचा बळी देणाऱ्या रेचनकर दापत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.