फडणवीस कारसेवेसाठी खरंच अयोध्येला गेले होते का? कारसेवकांच्या घोळक्याचा तो फोटो व्हायरल

मुंबई: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदीच्या पतनावेळी आपण अयोध्येत कार सेवेसाठी गेलो होतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा करत असतात. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या या दाव्याची वेळोवेळी खिल्ली उडवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करुन आपण बाबरी पतनावेळी अयोध्येला गेल्याचा पुरावा सादर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत अयोध्येला जाण्यासाठी निघालेल्या कारसेवकांच्या जथ्थ्यात उभे असलेले देवेंद्र फडणवीस उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो नागपूर रेल्वे स्थानकावरील असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

अयोध्येत सोमवारी राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. महाराष्ट्रातही भाजपकडून या सोहळ्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्यासाठी अयोध्येला गेलेल्या कार सेवकांच्या अनुभव कथनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही मी तरुण वयात कार सेवेसाठी अयोध्येत गेलो होतो, असा दावा अनेकदा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मी त्याठिकाणीच होतो, असेही फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, विरोधक त्यांच्या या दाव्याची कायमच खिल्ली उडवत आले होते. मात्र, आता फडणवीसांनी कार सेवेसाठी जातानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहलेल्या कॅप्शनमध्ये फडणवीसांनी म्हटले आहे की, ‘जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे’, असे फडणवीसांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर आता विरोधक त्यावर काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

अयोध्येला चढला रामरंग

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे दोन दिवस उरलेले असताना शनिवारी मंदिराला ताज्या टवटवीत फुलांनी आणि विशेष रोषणाईने सजविण्यास सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या सजली असून, शहराला धार्मिक रंग आला आहे. स्थानिकांच्या भाषेत ‘अयोध्या राममय हो रही है.’

‘राम मंदिराला नैसर्गिक फुलांनी सजविण्यात आले आहे. हिवाळ्यामुळे ती जास्त वेळ टवटवीत राहू शकतात. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती ताजी राहतील. फुलांचा दरवळ आणि सौंदर्यामुळे मंदिराच्या पावित्र्यात आणखी वाढ झाली आहे,’ अशी भावना मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली. फुले आणि रोषणाईच्या सजावटीच्या दोन वेगळी पथके नेमण्यात आली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मात्र पारंपरिक दिवेच लावले जाणार आहेत.

अयोध्येत राम मंदिर उत्सव, कुंभार बांधवांची लगबग; लाखो मातीच्या पणत्यांची निर्मिती, प्रचंड मागणी

Source link

Ayodhyababri masjidDevendra Fadnaviskar sevaram lalla pratishtapanaram mandirअयोध्या राममंदिरकारसेवादेवेंद्र फडणवीस
Comments (0)
Add Comment