ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ रा. राजस्थान) अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. दुकानमालक श्रीराम भवरलाल सुतार असून, जागामालक शुभम तुकाराम वाल्हेकर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीतील जय मल्हार कॉलनीत गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज या नावाने लाकडाची वखार आहे. त्याच्या बाजूला श्रीराम सुतार यांचे विनायक अॅल्युमिनियम प्रोफाइल या नावाने दरवाजे बनविण्याचे दुकान आहे. ललित आणि कमलेश दोघे त्यांच्याकडे कामाला होते. कमलेश हा १५ दिवसांपूर्वीच राजस्थानवरून आला होता. सोमवारी श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त दुकान बंद होते. त्यामुळे दोघांना सुट्टी होती. रात्री दोघे भाऊ दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास लाकडाच्या वखारीला आग लागली.
काही क्षणातच आगीची झळ शेजारील विनायक अॅल्युमिनियम दुकानाला बसली. धुरामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन पोटमाळ्यावरच पडून राहिले. आगीच्या ज्वाळा वरपर्यंत पोहोचल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली. परिसरातील निवासी इमारतीमधील सर्व रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली; तसेच एक मोटार, दोन दुचाकीदेखील जळाल्या.
दोन्ही दुकाने अनधिकृत होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शहरातील व्यावसायिक आस्थापनांमध्ये वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्वलनशील पदार्थ असणाऱ्या दोन हजार व्यावसायिक आस्थापनांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. – मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग
Read Latest Maharashtra News And Marathi News