Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोटमाळ्यावर झोपले असताना लाकडाच्या वखारीला आग, राम प्राणप्रतिष्ठेदिवशीच सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

33

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: लाकडाच्या वखारीला लागलेल्या आगीची झळ बसून दुकानात पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून, शेकोटी पेटविल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली आहे.

ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ रा. राजस्थान) अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. दुकानमालक श्रीराम भवरलाल सुतार असून, जागामालक शुभम तुकाराम वाल्हेकर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीतील जय मल्हार कॉलनीत गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज या नावाने लाकडाची वखार आहे. त्याच्या बाजूला श्रीराम सुतार यांचे विनायक अ‍ॅल्युमिनियम प्रोफाइल या नावाने दरवाजे बनविण्याचे दुकान आहे. ललित आणि कमलेश दोघे त्यांच्याकडे कामाला होते. कमलेश हा १५ दिवसांपूर्वीच राजस्थानवरून आला होता. सोमवारी श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त दुकान बंद होते. त्यामुळे दोघांना सुट्टी होती. रात्री दोघे भाऊ दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास लाकडाच्या वखारीला आग लागली.

काही क्षणातच आगीची झळ शेजारील विनायक अ‍ॅल्युमिनियम दुकानाला बसली. धुरामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन पोटमाळ्यावरच पडून राहिले. आगीच्या ज्वाळा वरपर्यंत पोहोचल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली. परिसरातील निवासी इमारतीमधील सर्व रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली; तसेच एक मोटार, दोन दुचाकीदेखील जळाल्या.

दोन्ही दुकाने अनधिकृत होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शहरातील व्यावसायिक आस्थापनांमध्ये वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्वलनशील पदार्थ असणाऱ्या दोन हजार व्यावसायिक आस्थापनांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. – मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.