नगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानिमित्त राऊत नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपनेते साजन पाचपुते तसेच योगीराज गाडे, अशोक गायकवाड, दत्ता जाधव, अशोक दहिफळे आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, नगरचे आमदार महाविकास आघाडी सरकारसोबत होते. मात्र, राज्यातील नव्या सरकारसमवेत आता ते आहेत व त्या सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत. नगरमधील गुन्हेगारीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे त्यांचा कोण बॉस आहे हे स्पष्ट होऊ द्या. महाराष्ट्रात गृहमंत्री आहे की नाही? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांचे पोशिंदे तर नाहीत ना? असा प्रश्न पडतो, असेही राऊत म्हणाले.
एकीकडे राम राम म्हणत मार्केटिंग करायचे व दुसरीकडे देवस्थानच्या व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी, भूखंड, शिवसेना नगरसेवकांची कामे लुटली जात आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहेत. व्यापाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहे व्यापार करणे त्यांना मुश्किल झाले आहे. शहर सोडण्याची भाषा ते करीत आहेत आणि तिकडे भाजप नैतिकतेच्या गोष्टी करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगरमधील आमदाराच्या ताबामारीवर छापामारी कधी करणार, असा सवाल करून राऊत म्हणाले, नगरमधील ही तांबेमारी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. मुंबईत गुंडगिरीविरुद्ध जशी लढली व संघर्ष केला, तसाच नगरमध्ये केला जाईल. आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरचे माजी आमदार अनिलभैया राठोड यांनी गुंडगिरी व झुंडशाही विरोधात टक्कर दिली आहे. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवत आहे. मात्र भैय्यांचा विधानसभेत पराभव का व कसा घडवला गेला, हे आम्हाला माहीत आहे, असेही भाष्य राऊत यांनी केले.
२०१४ पूर्वी महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य होते. मात्र, भाजपने राज्यात द्वेष व आकस वाढवला आहे. राजकीय विरोधकाला शत्रू मानून त्याला कुटुंबासह संपवण्याचे घातक राजकारण दिल्लीतील भाजप करीत आहे. द्वेष, सूड, बदला असे प्रकार मागील दहा वर्षापासून वाढले असून भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळे फासले आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
Read Latest Maharashtra News And Marathi News