‘बंद करुन दाखवले याचेही श्रेय घेणार का?’; राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हायलाइट्स:

  • नितेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
  • मुंबई महापालिकेतील त्या मुद्द्यावरुन केलं लक्ष्य
  • मुख्यमंत्र्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती

मुंबईः शिवसेना व राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. नारायण राणेंचे चिरंजीव व आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) एक पत्र लिहलं आहे. मुंबई महापालिकेतील (BMC) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी सुरु करण्यात आलेली गटविमा योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेवरुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना काही सवाल उपस्थित केले आहेत. योजना सुरू केल्यानंतर त्याचं श्रेय घेतलं, मग बंद झाल्यानंतर कोणाला श्रेय द्यायचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वाचाः पुण्यात मन हेलवणारी घटना; चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नितेश राणेंनी पत्रात काय म्हटलंय?

  • आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वताच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणासा माहित नाही का?

  • मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. १ ऑगस्ट २०१५ साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात ०१ऑगस्ट २०१७ ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही.

वाचाः सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची टीका

  • आपल्या हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये.

  • जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?

Source link

bmc employee bima policynitesh rane on cm uddhav thackerayrane vs shivsenaनितेश राणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment