धक्कादायक! पोलादपूरमध्ये तब्बल २८ शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा

रायगड : पोलादपूर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. येथे तब्बल २८ शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेने शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही खळबळ माजली आहे.

नाशिकमधील भोंसला मिलिटरी स्कूलची ३ दिवसीय सहल रायगडमध्ये गड-किल्ले पाहण्यासाठी आली होती. या सहलीमध्ये १०३ विद्यार्थी होते. ते प्रतापगड पाहण्यासाठी जाणार होते. तिसऱ्या दिवशी पोलादपूरमध्ये या सहलीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मुक्काम होता. पोलादपूर येथे आल्यानंतर प्रतापगडला जाण्यापूर्वी सर्व जण विश्रांतीसाठी थांबले असता यातील ३ ते ४ विद्यार्थ्यांना रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटेनंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. २४ मुलांनाही पोटदुखीचा त्रास होऊ लागण्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या सेवनामुळे मुलांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सद्यस्थितीत सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास त्यांना होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी १० मुलांना काही तासासाठी देखरेखीखाली ठेवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांना विषबाधा कोणत्या अन्नपदार्थांमुळे झाली? या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? याची सखोल चौकशी करण्याची मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.

Source link

28 school students food poisoningrailgad poladpur newsstudents food poisoningविद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधाविषबाधा
Comments (0)
Add Comment