हायलाइट्स:
- मशिदीत गणेशोत्सव साजरा केला जातो
- ४० वर्षांची धार्मिक सलोख्याची परंपरा
- शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना
सांगली : हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक समजलं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथे मशिदीत गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या ४० वर्षांची धार्मिक सलोख्याची परंपरा या गावातील तरुणांनी मनापासून जपली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच मोहरम, ईद, दिवाळी एकोप्याने साजरे करण्याचे वेगळे वैशिष्ट्य या गावाने टिकवून ठेवलं आहे. यामुळेच गोटखिंडी गावातील गणेशोत्सव दरवर्षी जिल्ह्यात चर्चेचा विषय असतो.
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेल्या ४० वर्षांपासून हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन मशिदीत गणपती बसवत आहेत. गावातील न्यू गणेश तरुण मंडळाने १९८१ साली पहिल्यांदा गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली. मात्र त्यावेळी जोरदार पावसाने मंडळाच्या मंडपाचं नुकसान झालं. यानंतर सर्वानुमते गणेशमूर्ती जवळच असलेल्या मशिदीत बसवली. तेव्हापासून आजतागायत गावातील हिंदू- मुस्लीम बांधव एकत्र येत मशिदीत गणपती बसवत आहेत.
अनेकदा गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजे एकत्र आले, तेव्हा मशिदीत एकाच मंडपात गणेशमूर्ती आणि पंजेही विराजमान झाले होते.
गेल्या ४० वर्षांपासून गणेश उत्सवामध्ये गावातील मुस्लीम बांधव मांसाहार करण्याचं टाळतात. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये ऐक्याचे दर्शन घडत आहे. सध्या करोनाचा काळ असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे न्यू तरुण गणेश मंडळाचे सचिव राहुल कोकाटे यांनी सांगितलं आहे.