हायलाइट्स:
- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ
- कोल्हापूर जिल्ह्यातही गेले तीन दिवस पावसाची संततधार
- पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेले तीन दिवस पावसाची संततधार कायम आहे. यामुळे राधानगरीसह सर्व धरणे शंभर टक्के भरली असून राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस कायम आहे. शहरात काही काळ पावसाची उघडीप असली तरी धरणक्षेत्रात तो जोरात कोसळत आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. यामुळे धरणातील पाणी साठा वाढला आहे. बहुसंख्य धरणे शंभर टक्के भरली आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले आहेत. आज चार दरवाजे उघडल्याने ५६८४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
संततधार पाऊस आणि धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी, ओढे, नाले यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या ओसंडून वाहू लागल्याने जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी पंचवीस फुटावर पोहोचली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातीलही अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.