मंगळवार पेठेत कमला नेहरू रुग्णालयाच्या मागे भीमनगर येथे महंमद आणि मुमताज शेख हे पती-पत्नी; तसेच शगुफ्ता आणि सुफिया या मुली असे चौकोनी कुटुंब छोट्या खोलीत वास्तव्याला आहे. महंमद शेख टेलरिंगचे काम करतात. मुमताज यांचे सिम्बायोसिस शाळेतील काम करोनाकाळात थांबले. शगुफ्ता पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. सुफिया ८४ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण झाली आहे. दोघींचे शालेय शिक्षण मुलींच्या नूतन मराठी विद्यालयात (नूमवि) झाले आहे. शेख कुटुंबीय दररोज गणरायाची पूजा करतात. त्यांच्या घरात एका बाजूला कुराण, तर दुसऱ्या बाजूला भगवद्गीता हे ग्रंथ पाहायला मिळतात.
‘मंगळवार पेठेतील भीमनगर भागात सर्व जातिधर्माचे लोक एकोप्याने राहतात. परिसरातील मंडळाचा भाऊ अध्यक्ष होता. धाकट्या मुलीच्या जन्मावेळी मी आजारी पडले. माझा जीव वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी घरातील व्यक्तींना सांगितले. मी आजारपणातून बरी झाल्यावर घरी तुझी प्राणप्रतिष्ठा करीन, ही माझी प्रार्थना गणपती बाप्पाने ऐकली. त्यानंतर मी आजारातून ठणठणीत बरी झाले. तेव्हापासून घरी गणेशोत्सव सुरू झाला. सुरुवातीला विरोध झाला; मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. गणेशोत्सव, दिवाळी, ईद अशा सर्व सणांना आजूबाजूचे लोक, नातेवाईक आवर्जून येतात,’ असे मुमताज यांनी सांगितले.
‘मुंबईत चौपाटीवर मूर्ती पाहून अस्वस्थ व्हायचो. पुण्यात परतल्यानंतर मातीच्या मूर्तीऐवजी चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. गणरायाची आम्ही रोज पूजा करतो. सर्वांनी एकोप्याने राहून एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे,’ असे मोहम्मद सांगतात. दोन्ही मुलींनी उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांचे आयुष्य घडवावे, अशी मुमताज यांची इच्छा आहे. शगुफ्ता आणि सुफिया दोघीही घरची परिस्थिती बदलण्यासाठी मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करीत आहेत.
धाकट्या मुलीच्या जन्मावेळी मी आजारी पडले. माझा जीव वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी घरातील व्यक्तींना सांगितले. मी आजारपणातून बरी झाल्यावर घरी तुझी प्राणप्रतिष्ठा करीन अशी प्रार्थना गणपती बाप्पाला केली आणि ही प्रार्थना गणपती बाप्पाने ऐकली. तेव्हापासून घरी गणेशोत्सव सुरू झाला.
– मुमताज शेख