रणदीप हु्ड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. सिनेमात त्यानं विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमात सावरकरांचं आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर बॉलिवूडचा सिनेमा म्हटल्यावर काहीशी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ही घेण्यात आली आहे. काही प्रमाणात हा सिनेमा ‘प्रपोगंडा’ स्टाइल मांडणीही करतो, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिल्या आहेत. या सिनेमात रणदीप सोबतच अंकिता लोखंडे, अमित सियाल, अपिंदरदीप सिंह यांच्याही भूमिका आहेत.
रणदीपच्या मेहनतीचं कौतुक
तर रणदीपनं या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक प्रेक्षक करताना दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपनं घेतलेली मेहनत प्रत्येक प्रसंगात दिसून येतेय.
कमाई किती?
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमाला फार मोठी ओपनिंग मिळावी नसल्याचं दिसून आलं. प्रचंड चर्चा, जोरदार प्रमोशन यानंतरही सिनेमानं पहिल्या दिवशी केवळ दीड कोटींचा गल्ला जमवला.
बजेट किती?
रणदीप हुड्डानं या सिनेमासाठी त्याचं घर विकल्याची चर्चा होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचं बजेट हे २० कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे.
कुणाल खेमूचा ‘मडगाव एक्सप्रेस’
तर, दुसरीकडे कुणाल खेमू याचं लेखन आणि दिग्दर्शन असेलला मडगाव एक्सप्रेस हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कॉमेडी सिनेमा असल्याकारणानं तरुणाईला हा सिनेमा आवडताना दिसतोय. तसंच या सिनेमानंही दीड कोटींच्या घरात कमाई केल्याचं दिसून आलं. या सिनेमात अविनाश तिवारी, दिव्येंदू शर्मा, प्रतिक गांधी, उपेंद्र लिमये, छाया कदम, रेमो डिसूजा या कलाकारांच्या भूमिका आहेत.