भाजपच्या संकल्पपत्राच्या प्रकाशन कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व पक्षाचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. देशाच्या राजधानीतील ६, दीनदयाळ मार्गावरील भाजप मुख्यालयाच्या विस्तारित वास्तूच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ल २७ सदस्यीय जाहीरनामा समितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल हे निमंत्रक आणि सहसंयोजक आहेत.
‘अब की बार ४०० पर’ या घोषणेसह भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे. सत्तारूढ पक्षाचे हे प्रस्तावित संकल्पपत्र हा मोदी सरकारच्या ‘तिसऱ्या कार्यकाळा’तील अपेक्षा व दृष्टिकोनाचा दस्तऐवज असणार आहेस असे सांगण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह विष्णू देव साई (छत्तीसगड) आणि मोहन यादव (मध्य प्रदेश) या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे. भाजपचा निवडणूक जाहीरनामा हा मोदी सरकारची धोरणे, उद्दिष्टे आणि प्रस्तावित कृती कार्यक्रमांचा व्यापक दस्तावेज असणार आहे.
केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास मतदारांना विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका समजून घेण्यासाठी हे संकल्पपत्र उपयुक्त ठरेल. मतदार यात दिलेली आश्वासने पाहू शकतात आणि पक्ष कारभारात पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करतो की नाही याचे मूल्यांकन करू शकतात. भाजपने मोदी सरकारच्या काळात, जे सांगितले ते केले असा पक्षाचा दावा आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राममंदिर, तीन तलाकबंदी आदी मुद्द्यांची उदाहरणे भाजप नेते देतात.