एप्रिलच्या सुरुवातीला इस्रायलने सीरियात केलेल्या हल्ल्यात इराणी लष्कराचे दोन जनरल ठार झाल्यानंतर इराण-इस्रायल संघर्षात नवी ठिणगी पडली. या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा इराणने दिला होता. अखेर इराणने शनिवारी मध्यरात्री इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. सुमारे ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली. हे हल्लासत्र रविवारी सकाळी संपल्याचे इराणने जाहीर केले आणि त्यानंतर इस्रायलने आपले हवाईक्षेत्रही खुले केले. ‘इराणने १७० ड्रोन आणि १२० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील ९९टक्के हवेतच पाडण्यात आली’, असे इस्रायलने सांगितले.
या हल्ल्यात इस्रायली हवाई तळाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात तिला जबर दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी याबाबत तपास सुरू असल्याचे इस्रायली पोलिसांनी सांगितले.
‘आम्ही क्षेपणास्त्रे भेदली. हल्ला रोखला. संघटितपणे आपणच जिंकू’, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, इस्रायलविरोधी मोहीम थांबवण्यात आल्याची घोषणा करताना इराणचे जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांनी आणखी हल्ले करण्याचा विचार नसल्याचे सांगितले.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुमारे साडेचार दशकांपासून सुरू असून, उभय देशांनी अनेकदा एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. मात्र, इराणने रविवारी केलेल्या हल्ल्याची तीव्रता अधिक होती, असे मानले जाते. मात्र, आपल्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे इस्रायलने हे हल्ले रोखण्यात यश मिळवले. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने ही प्रणाली विकसित केली आहे.
एअर इंडियाची सेवा स्थगित
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रविवारी तेल अविवची सेवा तूर्त स्थगित केली. एअर इंडियाची दिल्ली ते तेल अविव अशी सेवा आठवड्यातून चार वेळा असते. ती स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भारताची चिंता
पश्चिम आशियातील तणावामुळे भारताने चिंता व्यक्त केली. इराण आणि इस्रायलने राजनैतिक पातळीवर संवाद सुरू करून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारताने केले. भारताचे दोन्ही देशांतील दूतावास संपर्कात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.