भारताच्या अथक राजनैतिक प्रयत्नांनंतर कतारने भारतीय नौदलाच्या आठ निवृत्त अधिकाऱ्यांची सुटका केली होती. पंतप्रधान मोदींसह भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे यावेळी सर्वत्र कौतुक झाले. आपल्या सुटकेसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल वशिष्ठ यांनी मोदींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ‘आमचे हृदय कौतुक आणि आदराने भरलेले आहे’, असे नमूद करतानाच जीवनातील आव्हानात्मक टप्प्यावर दिलेला पाठिंबा आणि सुटकेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे तोंड भरून कौतुक केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना एकाही देशवासीयाला मागे न ठेवण्याचे तुमचे पवित्र व्रत आमच्या आत्म्यामध्ये खोलवर प्रतिबिंबित झाले आहे. तुम्ही आपल्या वचनबद्धतेची प्रामाणिकता वारंवार सिद्ध केलेली आहे’, अशा शब्दांत वशिष्ठ यांनी या पत्रात मोदींवर स्तृतिसुमने उधळली आहेत.
‘पंतप्रधान मोदींना विशेष अतिथी म्हणून अमेरिकेकडून आलेले बोलावणे, फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी लावेलली हजेरी आणि जी-२० शिखर परिषदेचे भूषवलेले यजमानपद यांसारखी त्यांची यशस्वी राजनैतिक घोडदौड पाहता आमच्या सुटकेसाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, याची कतारच्या तुरुंगात खात्री वाटत होती’, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
वशिष्ठ यांच्यासह या आठ निवृत्त भारतीय अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली कतारने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताच्या यशस्वी शिष्टाचारानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांची सुटका करण्यात आली व ते मायदेशी परतले.