ते म्हणाले, ‘घटनाबदल करण्याच्या आरोपापूर्वी मी केलेल्या कामाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असल्यापासून गेली दहा वर्षे पंतप्रधान म्हणून काम करीत असलेल्या निर्णयांचा मागोवा घेतला तर त्यामध्ये घटनाबदल करण्यासारखा एकही निर्णय नसल्याचे तुमच्या लक्षात येईल.’
‘इंडिया शायनिंग’चा प्रचार केला तशीच वेळ भाजपवर येणार असल्याच्या विरोधकांच्या म्हणण्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर लढविली जाते. या निवडणुकीत भाजपला जननेतून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. याउलट काँग्रेसच्या ‘युवराजां’नी दुसऱ्याच्या उद्धटपणाविषयी बोलणे त्यांना शोभत नाही. अर्थात काँग्रेसला आता आशा चमत्कारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शस्त्रे खाली टाकत आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला दणदणीत विजय मिळेल याची मला खात्री वाटते.’
देशातील लोकशाही धोक्यात असल्याच्या विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘युवराजांना निवडणूक जिंकता येत नाही म्हणून भारतातील लोकशाही ही हुकूमशाही ठरत नाही. ‘युवराजांना’ही येथे निवडणूक लढवावी लागते. त्यांच्याकडे देशातील जनता आकृष्ट होत नाही म्हणून या देशातील लोकशाहीचा दर्जा हीन ठरत नाही. संकुचित लोकशाही म्हणत हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप हा विरोधकांच्या पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. सत्ता मिळत नाही म्हणून देशाची प्रतिमा जागतिक पातळवीर मलीन करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत.’