कॅगरने नुकतीच आपली शाळा विकत घेऊन इमारत पाडली. या आठवड्यात, अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर सिमेंटच्या ढिगाऱ्याचे फोटो शेअर केले. शाळेची इमारत पाडल्यानंतरचा हा ढिगारा होता. ‘माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारहाण करीत असत. म्हणून मी शाळा खरेदी केली आणि ती इमारतच पाडली,’ असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका विशिष्ट मानसिक स्थितीमध्ये येऊन मी हे कृत्य केले आहे, असेही तो म्हणतो.
काही वेळातच हे फोटो ‘इंटरनेट’वर व्हायरल झाले आणि सोशल मीडिया यूजरनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी त्याच्या या कृत्यावर टीका केली, तर काहींनी त्याचे समर्थन केले. त्यापैकी एक म्हणाला, ‘कलाकार म्हणून तुमच्याबद्दल मला आदर आहे. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे अनुभव वेगळे आहेत; पण तुम्ही शाळा आणि सर्व काही उद्ध्वस्त केले, ते नक्कीच चांगले नाही.’ या शाळेत अनेक पिढ्या शिकल्या, त्यांच्याबद्दल काय, असा सवाल आणखी एका यूजरने केला. काही जणांनी कॅगलरच्या या कृत्याचे ‘बंडखोरी,’ म्हणून समर्थन केले. ‘तू माझे स्वप्न जगला आहेस. तुला आणखी शक्ती मिळो,’ अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. ‘मलाही माझ्या शाळेच्या बाबतीत असेच करायचे होते. माझे अनेक शिक्षक आपमतलबी होते,’ अशी प्रतिक्रिया आणखी एकाने नोंदवली.
कोण आहे कॅगलर?
कॅगलर हा एक तुर्की अभिनेता आहे. सन २०२० मध्ये ‘अफिल आस्क’मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय इतर काही मालिका आणि चित्रपटांत त्याने भूमिका केल्या आहेत.