बोइंगचे ‘स्टारलायनर’ अंतराळयान फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने अवकाशात झेपावणार होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी हे उड्डाण होणार होते. यासाठी सुनीता व विल्मर यांनी उलटगणती संपल्यानंतर उड्डाणापूर्वी दोन तास या अंतराळयानाच्या कॅप्सूलमध्ये प्रवेश केला. मात्र, या अंतराळयानास घेऊन जाणाऱ्या अॅटलास प्रक्षेपकाच्या वरील भागातील झडपेत मोठ्या प्रमाणात बिघाड निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. ‘ऑक्सिजनच्या दाबाचे नियमन करणारी ही झडप वारंवार उघडबंद होऊ लागली व त्यातून मोठा आवाजही येत होता,’ अशी माहिती ‘युनायटेड लाँच अलायन्स’चे सीईओ टोरी ब्रुनो यांनी दिली.
‘या झडपेचे आयुर्मान कदाचित संपले असल्याने हा बिघाड झाल्याची शक्यता आहे. ही झडप बदलावी लागल्यास ही मोहीम पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलावी लागेल. मात्र, ती दुरुस्त होण्यायोग्य असल्याचा निर्वाळा अभियंत्यांनी दिल्यास व तशी दुरुस्ती झाल्यास शुक्रवारपर्यंत ही मोहीम मार्गी लागू शकेल,’ असेही ब्रुनो म्हणाले.
यापूर्वीही बिघाड
बोइंगच्या या मोहिमेस नियोजनाच्या तुलनेत कमालीचा विलंब झाला आहे. यापूर्वीही विविध स्वरूपाच्या तांत्रिक बिघाडांमुळे ही मोहीम लांबली आहे. याशिवाय, बोइंग स्टारलायनरच्या मानवरहित अंतराळ मोहिमेस २०१९मध्ये अपयश आले होते.