हायलाइट्स:
- प्रवाशांनो लक्ष द्या!
- मुसळधार पावसामुळे ‘हा’ महामार्ग तब्बल १६ वर्षानंतर बंद
- पूर्णा नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय
परभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात जोरदार पाऊस झाला. कालपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या एलदरी धरण आणि हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने परभणीच्या पूर्णा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे तब्बल सोळा वर्षानंतर परभणी-नांदेड महामार्ग प्रशासनाकडून काल रात्रीपासूनच बंद करण्यात आला आहे.
पूर्णा नदी वरील नांदगावजवळ असलेल्या राहाटीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. रात्री नऊ वाजल्यापासूनच राहटी पुलावरून पाणी वाहने सुरू झाले होते. त्यामुळे परभणी नांदेड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाकडून हा महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साल २००६ साली, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळी येलदरी धरण आणि सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तेव्हा तब्बल तीन दिवसासाठी राहाटी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कधी राहटी पुलावरून पाणी गेल्याचं दिसून आलं नाही.
यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने तब्बल सोळा वर्षानंतर परत एकदा परभणी-नांदेड वाहतूक ही बंद करण्यात आली आहे.