तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ या चित्रपटाच्या शोला बुधवारी ११% प्रेक्षक उपस्थित होते. तर रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली होती. दुसरीकडे, ‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी कमी संख्येने प्रेक्षक उपस्थित होते पण हा चित्रपट जास्त कामाई करतोय. याचं कारण म्हणजे हा चित्रपट IMAX आणि 4DX व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला असून त्याच्या तिकिटाचा दर जास्त आहे.
‘श्रीकांत’ या चित्रपटाचं बजेट ४० कोटी
रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी १ कोटी ५० लाख रूपयांची कमाई केली. त्याच्या आदल्या दिवशी १ कोटी ६० लाख रुपयांची कमाई केली होती. अशाप्रकारे या चित्रपटाचं सहा दिवसातलं बॉक्स ऑफिस कलेक्शन १६ कोटी ४५ लाखांपर्यंत पोहोचलं आहे. या चित्रपटाचं बजेट ४० कोटी रुपये असून जर ह्याच वेगाने कमाई करत राहिला तर आठवड्याच्या शेवटपर्यंत बजेट ओलांडून नफा कमवू शकेल.
‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’चं कलेक्शन
दुसरीकडे, ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ या फ्रेंचायजीच्या ‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’ या चित्रपटाने सहाव्या दिवशी भारतात १ कोटी ८० लाख रुपयांची कमाई केलीये. या चित्रपटाने एकूण सहा दिवसात १७ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली असून जगभरात १२०० कोटी रुपयांचा आकडा पार केलाय.
श्रेयस तळपदेचा ‘कर्तम भुगतम’ शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे
‘शैतान’ या चित्रपटाच्या यशानंतर बॉक्स ऑफिसची अवस्था अत्यंत वाईट झालीये. गेल्या दोन महिन्यात एकही चित्रपट बंपर कमाई करत नाहीये. लहान बजेट असलेले काही चित्रपट हिट सुद्धा झाले आणि त्यांनी नफ्याचा टॅगही मिळवला. येत्या शुक्रवारी १७मेला श्रेयस तळपदेचा ‘कर्तम भुगतम’ हा एकच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.